20 वे शतक हे मानवाच्या इतिहासातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतिचे पर्व म्हणता येईल पण वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच प्रामुख्याने ‘हवामानातील बदल’ आणि ‘कमी होणारा संरक्षक ओझोन थर’ असे चिंताजनक प्रश्न आज समोर उभे ठाकलेत आणि संपूर्ण जीवसृष्टीच अस्तित्वच धोक्यात आले आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात लागलेल्या वाफेच्या इंजिनाच्या शोधांनंतर [1], औद्योगिकीकरणाच्या काळात सुरू झालेल्या कोळश्याच्या प्रचंड वापरामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड (CO2) आणि मिथेन (CH4) सारख्या घातक आणि विषारी हरितगृह वायूंचे प्रमाण वाढले. या वायूंमुळे पृथ्वीवरून परावर्तीत होणारी सूर्यकिरणे पृथ्वीच्याच वातावरणात राहिल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढले, यालाच ‘हरितगृह परिणाम’ (Greenhouse Effect) असे संबोधतात. यामुळे तापमान, पर्जन्य आणि वारे वाहण्याची पद्धत यांमध्ये झालेले लक्षणीय आणि दीर्घकालीन बदल म्हणजेच ‘हवामानातील बदल’ [2]. जगभरच्या शासनांनी, 21 व्या शतकाच्या शेवटपर्यंत, ही जागतिक तापमानवाढ 20 से. च्या खाली ठेवण्याचे ठरविले पण आजच्या घडीला त्या दिशेने परिणामकारक धोरणात्मक पाऊले उचलली गेली नाही आहेत असेच दिसते [3]. मे 2013 मध्ये कित्येक शतकांत पहिल्यांदाच हवेतील कार्बन डायऑक्साइड (CO2) चे प्रमाण 400 पीपीएम (parts per million), म्हणजे कार्बन डायऑक्साइड (CO2) च्या वरील सुरक्षा मर्यादा (Upper Safety Limit) 350 पीपीएम [4], च्या वरती जाऊन पोहोचले [3] [4]. अशातच अविरत वाढणारी लोकसंख्या आणि प्रचंड प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे परिस्थिति अजूनच बिकट होत चालली आहे.
आजचे तापमान हे औद्योगिकीकरण-पूर्वीच्या काळाच्या आधीच्या तापमानापेक्षा 0.80 से. [3] अधिक आहे त्यामुळे अशी तापमानवाढ रोखण्यासाठीचे चाललेले प्रयत्न कमी पडत असल्याचेच चित्र आहे. जागतिक तापमानवाढीचा सगळ्यात महत्वाचा धोका म्हणजे ‘ध्रुवीय हिमखंड’ वितळण्याचे वाढते प्रमाण. या वितळणार्या बर्फामुळे महासागरातील पाण्याची पातळी वाढत आहे आणि ही परिस्थिति जर आटोक्यात आणली नाही तर जगातले कित्येक देश पाण्याखाली जातील. इ. स. 1992 नंतर आजच्या घडीला 3 मिमी प्रति वर्ष [5] या दराने वाढत चाललेल्या पाण्याच्या पातळीमद्धे इ.स. 0 ते 1900 पर्यन्त फारसा बदल झालाच नव्हता [6].
हवामानात होणार्या बदलांमध्ये समावेश होणारा आणि प्रामुख्याने भारतासारख्या दक्षिण-आशियाई देशावर होणारा परिणाम म्हणजे ‘पर्जन्यातील बदल’. दर वर्षी ठराविक वेळी होणारी पर्जन्यवृष्ठी हीच या देशांतल्या शेती आणि पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत आहे. हवामानातील बदलांमुळे हा पर्जन्यकाळ 10-15 दिवसांनी पुढे जात आहे [7] [8]. जागतिक तापमानवाढ आणि हवेतल्या वाढत्या कार्बन डायऑक्साइड (CO2) मुळे महासागरांतील पाण्याची आम्लता वाढत आहे त्यामुळे अनेक सजीवांच्या नैसर्गिक मुलस्थानांमद्धे परिवर्तन होत आहे. याचा थेट परिणाम होतो तो ‘एकपेशीय वनस्पतींवर’ (algae) आणि तत्सम सजीव व त्यांच्या वाढीवर. अशा वनस्पति लहान आणि मोठ्या माश्यांचे प्रमुख अन्न असल्यामुळे माश्यांची संख्या कमी होत आहे. त्यातच ‘सी-फूड’ ची वाढती मागणी आणि त्यासाठी वाढलेली मासेमारी यामुळे पाण्यातील जीवसृष्ठीच्या संगोपनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे येणार्या दशकात जीवसृष्ठीचा र्हास वाढतच जाऊन मानवासमोर अशा जीवनाचे संरक्षण करण्याचा खूप मोठा प्रश्न उभा राहणार आहे [9] [10].
हवामनात होणार्या बदलांवर ‘आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी’ने 2013 साली प्रकाशित केलेल्या जागतिक ऊर्जा दृष्टीकोन (World Energy Outlook) या वार्षिक अहवालात 21 व्या शतकाअखेर जागतिक तापमानवाढ 20 से. च्या खाली रोखण्यासाठी एक चतु:सूत्री कार्यक्रम नमूद केला आहे. यात 1. विशिष्ट ऊर्जा कार्यक्षम पद्धतींचा अवलंब, 2. कमी कार्यक्षम असणार्या कोळश्याच्या बॉयलरचा कमीत कमी वापर आणि बांधणी 3. पेट्रोलियम तेल आणि वायु उत्पादनातील मिथेनचे उत्सर्जन कमी करणे 4. खनिज इंधनांच्या वापरवरील सूट पूर्णत: कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नांना वेग देणे, अशा पर्यायांचा समावेश होतो [3]. हवामानातील बदलांवर आंतर-शासकीय पॅनल (Intergovernmental Panel on Climate Change, IPCC) आणि कायटो प्रोटोकॉल (Kyoto Protocol) अशा गोष्टींची सुरुवात म्हणजे ‘हवामानातील बदलांवर’ उपाय शोधण्यासाठी आणि जागरूकता आणण्यासाठी उचललेली खूप महत्वाची पावले होत [11] [12].
अमेरिका, जर्मनी आणि फ्रांस सारख्या प्रगत अर्थव्यवस्था असणार्या देशांत इंधनाची मागणी वाढतच आहे तसेच चीन आणि भारत यांसारख्या प्रगतिशील देशांच्या अर्थव्यवस्थांची प्रचंड वेगाने होणारी प्रगति पर्यायाने इंधनांची आवक वाढवण्यासच कारणीभूत ठरेल. यातीलच एक घटक म्हणजे फक्त वाहतुकीमुळे उत्सर्जित होणार्या कार्बन डायऑक्साइड (CO2) मद्धे 62% प्रमाण हे निव्वळ जी-20 देशांमधील वाहतुकीमुळे होते [13]. जगातील प्रमुख महानगरात वाहतुकीच्या मुख्य वेळी तर ही पातळी कित्येक पटीने वाढते. वाढत्या लोकसंख्येसाठी रोजगार निर्मिती आणि वाढणारी ‘राहणीमानाची पत’ (living standard) यामुळे वाढणारी इंधनांची मागणी आणि संवेदनशील पर्यावराणाच्या सुरक्षेसाठी गरज आहे ती नवीन धोरणात्मक अमुलाग्र बदलांची आणि ‘अक्षय ऊर्जा स्त्रोतांच्या’ प्रगतिची. कारण, वाढती इंधनांची मागणी अशेच ऊर्जा-स्त्रोत पुरवू शकतील. त्याचबरोबर विकसनशील देशांत शाश्वत विकासाच्या मार्गावर चालणे अधिक गरजेचे आहे.
शाश्वत विकास आणि अक्षय ऊर्जा या दोन्ही गोष्टींसाठी गरज आहे ती म्हणजे पायाभूत घटकांच्या निर्मितीची आणि त्यांच्या संगोपनाची. याबरोबरच या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे मूलभूत आणि उपयोजित विषयांच्या संशोधनामध्ये गुंतवणूक करण्याची आणि नागरिकांच्या जागरुकतेची तसेच सक्रिय सहभागाची.
रणजित देसाई
This article reflects the views of the author and not necessarily those of collaborative policy consultants
References
[1] About.com, “Steam Engine History,” 2014. [Online]. Available: http://inventors.about.com/library/inventors/blsteamengine.htm. [Accessed: 10-Jan-2014].
[2] EPA, “Glossary of Climate Change Terms.” .
[3] IEA, “World Energy Outlook Special Report,” Paris, France, 2013.
[4] Co2now.org, “CO2 Now.” [Online]. Available: http://co2now.org/. [Accessed: 17-May-2013].
[5] NOAA, “National Oceanic and Atmospheric Administration (NOAA) Home Page,” 2013. [Online]. Available: http://www.noaa.gov/. [Accessed: 10-Jan-2014].
[6] NOAA, “Is sea level rising?,” 2013. [Online]. Available: http://oceanservice.noaa.gov/facts/sealevel.html. [Accessed: 10-Jan-2014].
[7] Annamalai, “Global Warming Shifts the Monsoon Circulation, Drying South Asia,” J. Clim., vol. 26, no. 9, pp. 2701 –2718, 2013.
[8] “Abrupt Climate Change Could Drag Monsoon Over the Ocean, Decreasing Vegetation Growth : TreeHugger,” 2014. [Online]. Available: http://www.treehugger.com/natural-sciences/abrupt-climate-change-could-drag-monsoon-over-the-ocean-decreasing-vegetation-growth.html. [Accessed: 10-Jan-2014].
[9] “Climate Change Affects Biodiversity.” [Online]. Available: http://www.globalissues.org/article/172/climate-change-affects-biodiversity.
[10] “Climate Change and Biodiversity Loss | The Center for Health and the Global Environment,” Harvard, 2012. [Online]. Available: http://chge.med.harvard.edu/topic/climate-change-and-biodiversity-loss. [Accessed: 10-Jan-2014].
[11] IPCC, “IPCC – Intergovernmental Panel on Climate Change,” 2014. [Online]. Available: http://www.ipcc.ch/organization/organization_history.shtml#.Uuoik_QW3DQ. [Accessed: 30-Jan-2014].
[12] UNFCCC, “KYOTO PROTOCOL,” 2014. [Online]. Available: http://unfccc.int/essential_background/kyoto_protocol/items/1678.php. [Accessed: 30-Jan-2014].
[13] IEA, “G-20 CLEAN ENERGY, AND ENERGY EFFICIENCY DEPLOYMENT,” Paris, France, 2011.
image source: Obra19, copyrights with creator,Creative Commons License, http://commons.wikimedia.org/wiki/File:BANGUI_WINDMILL,ILOCOS_NORTE_2.jpg